पुण्यात ३४ किलो चरस घेऊन आलेल्या दोघांना अटक; रेव्ह पार्ट्यांसाठी होणार होता वापर

Crime_Arrest
Crime_Arrest
Updated on

पुणे : नववर्षाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे, मुंबईसह विविध राज्यात विक्री करण्यासाठी रेल्वेने आणण्यात आलेला तब्बल 34 किलो चरस अंमली पदार्थ लोहमार्ग पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. त्याची किंमती एक कोटी तीन लाख 64 हजार रुपये आहे. लोहमार्ग पोलिसांनी याप्रकरणी हिमाचल प्रदेशातील दोघांना अटक केली आहे. 

ललितकुमार दयानंद शर्मा (वय 49, कुलु, हिमाचल प्रदेश), कौलसिंग रूपसिंग सिंग (वय 40, रा. हिमाचल प्रदेश) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. पुणे लोहमार्ग विभागाचे पोलिस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशातून दोघेजण पुण्यात चरस हा अंमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची खबर त्यांना त्यांच्या एका वर्गमित्र पोलिस अधिकाऱ्याकडून प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलिसांनी चार पथके तयार केली होती. या पथकांकडून सलग सात दिवस दिल्लीतुन पुण्यात येणाऱ्या रेल्वेच्या प्रवाशांची कसून तपासणी केली जात होती. दरोडा पथकातील चार अधिकारी व 45 पोलिसांकडून गस्त घातली जात होती. 

दरम्यान, पुणे रेल्वे स्थानकाजवळील वाडीया पुलाजवळ 19 डिसेंबरला रात्री पावणे अकरा वाजता दोघेजण अंमली पदार्थ घेऊन थांबले असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्याकडील बॅगेमध्ये असलेला तब्बल 34 किलो 404 ग्रॅम इतक्‍या वजनाचा चरस पोलिसांनी जप्त केला. त्याची भारतीय बाजारमुल्यानुसार एक कोटी तीन लाख 64 हजार रुपये किंमत होते, तर आंतरराष्ट्रीय बाजारानुसार 120 कोटी रुपये किंमत होत असल्याचे वायसे पाटील यांनी सांगितले. दरम्यान, आरोपींवर अंमली पदार्थ बाळगणे व विक्रीसाठी आणल्याप्रकरणी लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना दोन जानेवीरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

मोठ्या शहरात रेव्ह पार्ट्यांसाठी वापर 
नववर्षाच्या स्वागतासाठी पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, बंगळुरू, गोवा येथे छुप्या पद्धतीने रेव्ह पार्ट्यांचे आयोजन केले जाण्याची शक्‍यता आहे. त्या पार्ट्यांमध्येच सहभागी होणाऱ्यांसाठीच संबंधीत चरस आणण्यात आला होता. 34 किलो चरस पैकी 22 किलो चरस मुंबईसाठी, पाच किलो गोव्याला, पाच किलो चरस बंगळुरू व दोन किलो चरस पुण्यात पाठविला जाणार होता. त्याबाबत पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी माहिती दिली. 

वाहनांच्या बनावट सायलेन्सरमधून चरसची तस्करी 
ललितकुमारहा हिमाचल प्रदेशातील कुलू जिल्ह्यात ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतो. तसेच त्याची सफरचंदाची शेती आहे. तर कौलसिंग हा ललितकुमारकडे चालक म्हणून काम करतो. मनाली पासून 40 किलोमीटर अंतरावर मनाला, रसेल, पुल,तोश, छलांग अशी गावे आहेत. तेथेच घरोघरी चरसची निर्मिती केली जाते. तेथून देशभरात विक्री करण्यासाठी चरसच्या पुड्या बांधून त्या बनावट सायलेन्सरमध्ये ठेवून कसोल या तालुक्‍याच्या ठिकाणी, त्यापुढे दिल्ली येथे आणले जातात. दिल्लीत सायलन्सर फोडून चरस पाकिटामध्ये भरून, त्या पाकिटांना कार्बन कागदाचे आवरण लावले जाते. त्यामुळे तपासणीच्यावेळी ते दिसून येत नाही. दिल्लीतून देशाच्या वेगवेगळ्या भागात त्याची विक्री करण्यासाठी ते पाठविले जातात. बाजारामध्ये चरसची सध्या प्रति ग्रॅम तीन हजार रुपये इतक्‍या दराने विक्री होत असल्याचे वायसे यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.